हायटेक शेतकरी

image

शेतीवर आधारीत उद्योग

दुग्ध व्यवसाय

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात.

आदर्श गोठा

- गाई-म्हशीसाठीचा गोठा आदर्श असावा. गाई-म्हशींची संख्या १६ पर्यंत असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा असावा. आणि १६ पेक्षा जास्त संख्या असेल तर दुहेरी गोठा असावा. तोंडाकडे तोंड,अगर शेपटीकडे शेपटी आणि मध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता अशी रचना असावी. शेपटीकडे शेपटी म्हणजे tail to tail हि रचना चांगली असते. तोंड खिडकी कडे असल्याने हवा मिळते. संसर्गजण्य रोग होण्याचा धोका नसतो. दुध काढणं सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटकोब्याची असावी. मुत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने नाळी असावी. गोठ्याची उंची १४ ते १५ फुट असावी. ८ फुट भिंत आणि ४ फुट खिडकी ठेवावी. गाई-म्हशीला १.५ ते १.७ मीटर लांब आणि १ ते १.२ मीटर रुंद अशी गोठ्यात जागा असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गाई-म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या रोज ३% वाळलेला आणि हिरवा चार असावा. प्रत्येक लिटर दुध पाठीमागे ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्य, तर ५० ते १०० ग्राम क्षारमिश्रण देणे महत्वाचं आहे. अ, ब, क, आणि ई जीवनसत्वासाठी हिरवा चारा दिलं गेलाच पाहिजे. म्हणजे दुधत घनपदार्थ (एसएनएफ) म्हणजेच जास्त फॅट मिळते. अलीकडे जैविक दुधनिर्मितीला महत्व प्राप्त झालेले आहे. गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या, फाशी, ब्रुसेलोसीस हे जीवाणूजन्य आजार, तर देवी, बुळकांडी, लाल्याखुरकूत, रेबीज, डेंग्यू, हे विषानुजान्य रोग, गोचीड आणि जंत हे परोपजीवी रोग आढळतात. त्यासाठी लसीकरण करून घ्यावे म्हणजे जनावराचं आरोग्य चांगलं राहतं.

दुधाळ गाईची निवड करताना कोणत्‍या गोष्‍टी विचारात घ्‍याव्‍यात

१) दुधाळ गाईची निवड करताना तिचं बाह्यस्वरूप, दुधुत्पादन आणि प्रजननक्षमता विचारात घ्यावी.
२) गाय विकत घेताना अगर निवडताना तिचे दुध २-३ वेळा काढून उत्पादनाची खात्री करून घ्यावी. केवन मोठया आकाराची कास याबाबतीत गृहीत धरू नये.
३) गाईला पान्हावयास किती वेळ लागतो? टी आंबोणशिवाय धार देते का? किंवा नाही? तिला ठराविक गवळ्याची सवय आहे का? या गोष्टींचीही खात्री करून घ्यावी.
४) तापट स्वभावाच्या गाई, उत्तेजित झाल्या, कि पान्हा चोरतात म्हणून शांत स्वभावाची गाय निवडावी.
५) धारेच्या वेळी लाथा मारणारी, चीर्गुत, दगड आणि विटा चघळण्याची सवय असणारी गाय घेणं टाळाव.
६) धरेला (पिळण्यासाठी) हलकी असणारी गाय निवडावी. जड गायी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळं दूधही कमी निघते. धार काढून पाहताना चारही सडातील दुध काढून पाहावं.
७) गाय विकत घेताना शक्यतो दुसऱ्या वेतातील गाय निवडावी.
८) जातिवंत दुधाळ गाई तरतरीत आणि निरोगी दिसतात.
९) त्यांचे डोळे पाणीदार असतात.
१०) सर्व अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असते.
११) शरीराचा आकार वरून, पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केलं असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसतो.
१२) गाईकड पुढून पाहिलं असता दोन पायातलं अंतर अधिक असाव.
१३) छाती भरदार असावी.
१४) वरून पाहिलं असता कमरेची हाडं दूरवर असावीत.
१५) बाजूनं पाहिलं असता शेपटीवरील दोन हाडं आणि कास यामध्ये अधिक अंतर असावं.
१६) गाय लठ्ठ नसावी.
१७) लांब आणि सडपातळ असावी.
१८) पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा.
१९) पाठीला बक असणाऱ्या गाई शक्यतो टाळाव्यात.
२०) गाईंच्या खुरांचा रंग काला असावा.
२१) वाढलेल्या नख्या किंवा खुरसडा याबाबतीत बारकाईने चौकसपणे बघावं.
२२) गाय विकत घेताना टी चालवून- फिरवून पहावी. २३) कास हा दुभत्या जनावरांचा महत्वाचा अवयव. कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी. धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठी दिसते. सड फुगलेले दिसतात. दुध काढल्यानंतर कासेच आकार पूर्ववत लहान होणारा असावा. त्वचा मऊ असावी. २४) कासेवर अनेक फाटे असणारं शिरांच जाळ असावं. शिरा जड असाव्यात. २५) चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत. २६) ज्या वेळी गाईची दुध उत्पादनाची, प्रजननक्षमतेची आणि वंशावळीची माहिती खात्रीशीरपणे उपलब्ध होते, त्याचवेळी या माहितीच्या आधारे आणि आताच सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे गाय विकत घेतान तिची निवड करावी.

यशस्वी दुग्धोत्पादनातील पंचसूत्री :

गाई - म्हशींच्या कासेचे आरोग्य राखण्यासाठी धार काढणारी व्यक्ती निरोगी हवी. धार काढताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत. हाताची नखे वाढू देऊ नयेत. आजारी व्यक्तीने धार काढू नये. अंगठा मुडपून दूध काढू नये, कारण त्यामुळे सडास अंतर्गत भागात जखमा होऊन जंतूसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. म्हणून मूठबंद पद्धतीने दूध काढावे. दूध पूर्ण काढावे. कासेत दूध राहिल्यास काससुजीला आमंत्रण मिळते. दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ धुऊन कोरडी करावी. कास धुण्यासाठी स्वच्छ पाण्यात एक टक्का पोटॅशिअम परमॅंगनेट मिसळावे. पहिल्या काही धारांमध्ये जिवाणूंचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे असे दूध कासेला किंवा हाताला लावू नये. कास सुजी झालेली गाय सर्वांत शेवटी पिळावी. कास सुजीतील दूध गोठ्यातील जमिनीवर काढू नये. असे दूध वेगळ्या पातेल्यात काढून गोठ्यापासून लांब पुरून टाकावे. धार काढल्यानंतर सडाची छिद्रे अर्धा तास उघडी राहतात, त्यामुळे जनावराला अर्धा तास खाली बसू देऊ नये. दूध काढल्यानंतर जनावराला वैरण टाकल्यास जनावर खाली बसत नाही आणि गोठ्यातील शेणा-मातीतील जंतू कासेत प्रवेश करण्यास प्रतिबंध होतो. गाभण गाय आटवत असताना प्रत्येक सडात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविक सोडावे. वासरांचे संगोपन वेगळे करावे. लांब सड व लोंबती कास असलेल्या गाई / म्हशी घेऊ नयेत. दर पंधरा दिवसांनी गोठ्यातच कासदाहासाठी (सी.एम.टी.) चाचणी करावी. दुधात कोणताही बदल दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

निरोगी प्रजनन संस्था -

जनावरांच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी दरवर्षी सांसर्गिक गर्भपाताची चाचणी करून घ्यावी. नोंदणीकृत व जबाबदार पशुवैद्याकडून कृत्रिम रेतन करावे. वार अडल्यास स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीकडून वार काढल्यास गर्भाशयास इजा होण्याची शक्‍यता असते. जनावरांना योग्य मात्रेत खनिजद्रव्ये दिल्यास उलटण्याचे प्रमाण कमी होऊन प्रजनन संस्थेचे आरोग्य टिकून राहते. गर्भाशयाचे गंभीर आजार झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे करावे. गर्भपात झालेले गर्भ आणि वार गोठ्यापासून लांब पुरून टाकावे. आजारी जनावरांना योग्य उपचार करावेत. निरोगी पचन संस्था : वैरण जमिनीवर न टाकता गव्हाणीत टाकावी. वैरणीची कुट्टी करून द्यावी. कुट्टी करत असताना बोटभर लांब तुकडे करावेत. फार बारीक तुकडे करू नयेत. जनावरांना फक्त ओला किंवा फक्त वाळका चारा देऊ नये. एकाच प्रकारचा चारा दिल्यास जनावराचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे चाऱ्यात पुरेशी लाळ मिसळली न गेल्याने पोटाचे विकार संभवतात. जनावरांना एकाच वेळी जास्त वैरण न देता दिवसातून चार ते पाच वेळा थोडी थोडी वैरण द्यावी. जनावरांना उकिरड्यावर चरू देऊ नये. जनावराला स्वच्छ व ताजे पाणी द्यावे, साचलेले घाण पाणी देऊ नये. गोठ्यातील सर्व जनावरांचे नियमित जंतनाशन करावे. समतोल आहार देण्याचा प्रयत्न करावा. पचन संस्थेच्या सांसर्गिक रोगांपासून ग्रस्त जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवावीत. पचन संस्थेच्या कुठल्याही विकारावर तत्काळ उपाययोजना करावी.

स्वच्छ गोठा -

गोठा स्वच्छ, कोरडा, हवेशीर व उबदार ठेवावा. गोठ्यात ओलावा वाढल्यास जंतूंची वाढ होते. गोठ्यात पुरेसा प्रकाश असावा. शेण - मूत्र साठू देऊ नये. आजारी जनावराची विष्ठा, मूत्र, उरलेला चारा जाळून टाकावा. आजारी जनावराची वेगळी व्यवस्था ठेवावी. गोठ्यात वैरण / उरलेली वैरण साचू देऊ नये. शक्‍य झाल्यास जनावरांना रोज धुऊन खरारा करावा, त्यामुळे परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. रक्ताभिसरणाला चालना मिळून ताजेपणा वाटतो. रोगी जनावरांना त्वरित उपचार करावा. उन्हाळ्यात गोठा थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. खंगत जाणाऱ्या जनावरांची चाचणी करून घ्यावी. आठवड्यातून एकदा पाण्याचा हौद धुऊन चुन्याने रंगवून घ्यावा. पाण्यात शिफारशीत निर्जंतुक औषधी योग्य प्रमाणातच टाकावी. जनावरांचे लसीकरण नियमित करावे.

स्वच्छ दूधनिर्मिती -

रोगी व अस्वच्छ जनावरांपासून स्वच्छ दूध मिळत नाही. दूध स्वच्छ नसल्यास टिकवणक्षमता कमी होऊन दूध नासते. म्हणून जनावरे निरोगी व सशक्त असावीत. दूध काढताना प्रत्येक सडातील चार - पाच धारा वेगळ्या भांड्यात काढाव्यात. हे दूध इतर दुधात मिसळू नये. दूध काढताना जनावराला कोरडा आणि उग्र वास असलेला चारा देऊ नये. दूध काढण्याची जागा स्वच्छ व धूळमुक्त असावी. त्या ठिकाणी माश्‍या व डासांचा प्रादुर्भाव नसावा. दुधाची भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेली असावीत. दुधाची भांडी दररोज धुण्याच्या सोड्याने गरम पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावीत आणि कोरडी करावीत. दूध काढून झाल्यानंतर ते गोठ्यातून त्वरित हलवावे. दूध गाळून थंड ठिकाणी (शक्‍य असल्यास बर्फाच्या पेटीत) ठेवावे. दूध काढल्यानंतर सड निर्जंतुक द्रावणात बुडवून घ्यावेत आणि दूध लवकरात लवकर संकलन केंद्रात पोचवावे.

गुरांमधील वंध्यत्व: कारणे आणि उपचार -

गुरांमधील वंध्यत्व हे भारतातील दुग्धशेती आणि दुग्ध उद्योगाच्यात मोठ्या आर्थिक हानिचे कारण आहे. वांझ प्राण्यांना पोसणे हे एक आर्थिक ओझे असते आणि अनेक देशांमध्ये अशी जनावरे कत्तलखान्यात पाठवली जातात. गुरांमध्ये, सुमारे १०-३० टक्के गुरे व्यंधत्व किंवा प्रजननाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असतात. चांगला प्रजनन दर गाठण्यासाठी किंवा पाडसांचा उच्च दर गाठण्यासाठी नर आणि मादी, दोघाही प्राण्यांना चांगला आहार दिला पाहिजे आणि आजारांपासून मुक्त ठेवले पाहिजे.

वंध्यत्वाची कारणे

वंध्यत्वाची कारणे अनेक आहेत आणि ती गुंतागुंतीची असू शकतात. वंध्यत्व किंवा गर्भार राहण्यास आणि पाडसाला जन्म देण्यास असमर्थता यामागे कुपोषण, जंतुसंसर्ग, जन्मजात दोष, व्यवस्थापकीय चुका आणि मादीमधील अंडाशय किंवा संप्रेरकांमधील असमतोल ही कारणे असू शकतात.

लैंगिक चक्र:

गाई आणि म्हशींचे लैंगिक चक्र (ऑयस्ट्रस) १८-२१ दिवसांतून एकदा १८-२४ तासांसाठी असते. मात्र म्हशींमध्ये हे चक्र जाणवून येत नाही त्यामुळे शेतक-यांसमोर मोठी समस्या उभी राहते. शेतक-यांनी प्राण्यांचे पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत ४-५ वेळा जवळून निरीक्षण करावे. कमी उष्णरता गेल्यामुळे व्यंधत्वाची पातळी वाढू शकते. चक्रामध्ये असणार्या प्राण्यांमध्ये दृश्य चिन्हे ओळखण्यासाठी बर्‍यापैकी कौशल्याची गरज असते. जे शेतकरी उत्तम नोंदी ठेवतात आणि प्राण्यांचे निरीक्षण करण्यात अधिक वेळ घालवतात त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतात.

वंध्यत्व टाळण्यासाठी टिपा

• ऑयस्ट्रस कालावधीच्यात दरम्यान प्रजनन करावे.
• त्या प्राण्यांमध्ये ऑयस्ट्रस दिसत नाही किंवा चक्र येत नाही त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करावेत.
• पोटातील जंतांपासून संसर्गाच्या बचावासाठी व प्राण्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ६ महिन्यांतून एकदा डिवर्मिंग करावे. नियमित डिवर्मिंगमध्ये लहानशी गुंतवणूक केल्याने दुग्धोत्पादनात मोठा फायदा होऊ शकतो.
• गुरांना उर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांच्या पुरवण्या असणारा संतुलित आहार द्यावा. यामुळे गर्भार राहण्याचा दर, निरोगी प्रसूती, सुरक्षित जन्म, कमी जंतुसंसर्ग आणि निरोगी पाडस होणे यांत मदत होते.
• लहान मादी पाडसांची योग्य पोषण देऊन काळजी घेतल्यास त्यांना वेळेवारी पौगंडावस्था गाठता येते आणि त्यांचे वजन ही २३०-२५० कि.ग्रा. चे आदर्श प्रमाण गाठू शकते जे प्रजननासाठी आणि योग्य गर्भारपणासाठी आवश्यक असते.
• गर्भावस्थेमध्ये पुरेशा प्रमाणात हिरवा चारा खायला घातल्याने नवजात पाडसांमधील अंधपणा टाळता येतो आणि जन्मानंतर नाळ सांभाळून ठेवता येते.
• नैसर्गिक सेवेमध्ये जन्मजात दोष आणि संसर्ग टाळण्यासाठी बैलाचा प्रजनन इतिहास खूप महत्त्वाचा असतो.
• गाईंची प्रसूती स्वच्छ जागेमध्ये केल्याने गर्भाशयाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात टाळता येतात.
• गर्भरोपणानंतर ६०-९० दिवसांनी प्राण्यांना गर्भारपणाच्या निश्चितीसाठी प्रशिक्षित पशुवैद्याद्वारा तपासावे.
• गर्भधारणा होते तेव्हां मादी अॅधनेस्ट्रस (नियमित ऑयस्ट्रस चक्रे न येणे) च्या कालावधीमध्ये प्रवेश करते. गाईसाठी गर्भावस्था कालावधी सुमारे २८५ दिवस तर म्हशींसाठी ३०० दिवस असतो.
• गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात अनियंत्रित ताण आणि वाहतूक टाळावी.
• अधिक चांगले पोषण देण्यासाठी आणि प्रसूतीसाठी नेहमीच्या घोळक्यापासून दूर ठेवले जाऊ शकते.
• गर्भार प्राण्यांना त्यांच्या प्रसूतीपूर्वी दोन महिने त्यांचे दूध निथळू द्यावे आणि त्यांना पुरेसे पोषण व व्यायाम द्यावा. यामुळे आईचे आरोग्य सुधारण्यास, जन्माच्या वेळीच्या सामान्य वजनासह पाडसाचा जन्म होण्यास, आजाराचे प्रमाण कमी होण्यास आणि लैंगिक चक्र पुन्हा लवकर सुरु होण्यास मदत होते.
• बचतपूर्ण आणि नफादायक दुग्धशेतीसाठी दरवर्षी एक पाडस हा दर गाठण्यासाठी प्रसूतीनंतर चार महिने ते १२० दिवसांच्या आत प्रजनन सुरु करावे.

गारगोटी © 2018