हायटेक शेतकरी

image

खते व कीटकनाशके

रासायनिक खते

यामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असून ते पिकांना लवकर उपलब्ध होते. ज्या रासायनिक खतामध्ये ठराविक प्रमाणात एकापेक्षा अधिक अन्नद्रव्ये संयुक्त अवस्थेत आणली जातात त्यांना संयुक्त खते म्हणतात. रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमाचा वापर न करता एक वा अधिक अन्न्द्रव्ये मिसळून तयार केलेल्या खतांना मिश्रखते म्हणतात.

रासायनिक खताचे प्रकार :

१. नत्रयुक्त खते : युरिया, अमोनियम सल्फेट
२. स्फुरदयुक्त खते : सुपर फॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट
३. पालाशयुक्त खते : म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश
४. दुय्यम खते : चुना, गंधक, मॅग्नेशियम
५. सूक्ष्म अन्नद्रव्ये : जस्त सल्फेट, मोरचूद, हिराकस, मँगनीज सल्फेट, बोरॅक्स, अमोनियम मॉलिब्डेट

गांडूळे व जमिनीची सुपिकता

गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व खनिज नत्राचे प्रमाण वाढते .

गांडूळ खत (व्हमी कंपोस्ट )

ज्या खतात गांडूळाची विष्ठा नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ ,गाडूळाची अंडीपुंज ,त्यांच्या बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो त्या खतास गांडूळ खत म्हणतात . जाती :आयसेनिया फिटीडी ,युड्रीलस ,लँम्पेटो मारूटी संरक्षण : उन्हाळ्यात ताट्याचे छप्पर, पावसाळ्यात प्लास्टिकचे छप्पर

शिफारशी

1. जमिनीत उपलब्ध जस्त कमी असल्यास १७.७५ कि.ग्रॅ. जस्त सल्फेट प्रति हेक्टरी ज्वारी – गहू अथवा साळ – हरभरा या पीक चक्रामध्ये जमिनीतून द्यावे.
2. जमिनीत जलद्राव्य बोरॉनचे प्रमाण कमी असल्यास ५ कि.ग्रॅ. प्रति हेक्टर बोरॅक्स कापसाच्या पिकास जमिनीतून द्यावे.
3. चुनखडीयुक्त जमिनीत मसुरी रॉक फॉस्फेट आणि जीवाणूखत याचा वार साळ, भुईमूग या पीक चक्रामध्ये जमिनीतून करावा.
4. भुईमूग पिकास हेक्टरी ५० किलोग्रॅम स्फुरदाची मात्रा बोरॉनयुक्त सुपर फॉस्फेट किंवा ५ किलो बोरॅक्स अधिक सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे जमिनीतून दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
5. सूर्यफुल या पिकास हेक्टरी ७५ कि.ग्रॅ. स्फुरदाची मात्रा बोरान युक्त सुपर फॉस्फेट किंवा ७.५ कि.ग्रॅ. बोरॅक्स अधिक ७५ कि.ग्रॅ. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे (उत्पादनात वाढ होण्यासाठी) जमिनीतून द्यावी.
6. सर्वसाधारणपणे द्विदल पिके विशेषत: सोयबीन हे पीक सरी आणि वरंबा पद्धतीने घेतल्यास आणि स्फुरदाची जास्त मात्रा १२० कि.ग्रॅ. स्फुरद प्रति हेक्टरी तसेच शिफारशीप्रमाणे नत्राची मात्रा दिल्यास रबी ज्वारीमध्ये नत्र आणि स्फुरदाची कार्यक्षम वापर होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि उत्पादनात भरीव वाढ होते.

एकात्मिक पीक पोषण पध्‍दती

रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते आणि सेंद्रिय द्रव्ये यांचा योग्य प्रमाणात पूरक खते म्हणून वापर करण्याच्या पद्धतीस एकात्मिक पीक पोषण पद्धती असे म्हणतात. या पद्धतीत रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल साधला जातो. तसेच पिकांच्या फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश करुन जमिनीची सुपिकता टिकविली जाते. या पद्धतीत पिकांच्या भरघोस उत्पादनाबरोबरच अन्नधान्य आणि जमिनीचा दर्जा सुधारला जातो. महागड्या रासायनिक खतांची बचत करुन जमिनीची उत्पादकता वर्षानुवर्षे सुधारली जाते. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे अन्नद्रव्याच्या एकूण गरजेपैकी अर्धी मात्रा रासायनिक खतामधून दिली जाते आणि उरलेली अर्धी मात्रा सेंद्रिय खतांमधून भागविली जाते. दर तीन वर्षातून एकदा हिरवळीच्या खतांची पिके घेऊन जमिनीत गाडण्याची शिफारस केली आहे. पिकांचे सर्व अवशेष जसे ऊसाचे पाचट, ज्वारीची धसकटे, गहू व साळीचे बुडखे, सुर्यफुलाचे खोड आणि भुसा डाळवर्गीय पिकांचे सर्व अवशेष, इत्यादी जमिनीत गाडून सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविले जाते. या बरोबरच जिवाणू खते व गांडूळ खतांचा वापर करणे गरजेचे असते.

रासायनिक खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा.

1. दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा (नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५) (अमोनियम फॉस्फेट २८:२८:०)
2. स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट
3. डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट
4. स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा.
5. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा. (निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया).
6. हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.
7. साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खत (बायो अर्थ कंपोस्ट) चा वापर करावा.

रासायनिक खते कशी द्यावीत

1. साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत.
2. नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाच अवस्था लक्षात घेऊन २ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत.
3. चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत.
4. नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत.
5. पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.

गारगोटी © 2018