हायटेक शेतकरी

image

शेत तळे

शेत तळे

शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. मुख्यत्वे संरक्षित सिंचनासाठी, तसेच पाणी जिरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे यातून साधता येते. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. काही क्षेत्र रब्बी पिकाखालीही आणता येऊ शकते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. ज्या ठिकाणी जमीन जवळ जवळ सपाट असेल त्या ठिकाणी खड्डा खोदून तळे तयार करावे, तर काही ठिकाणी नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून किंवा नाला शेताजवळून वाहत असल्यास त्याला अडवून शेततळ्यात पाणी साठवता येते. शेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी. कमीत कमी मातीकाम करून जास्तीत जास्त पाणी साठविता येईल, अशी जागा निवडावी. सभोवताली जमीन दलदल व चिबड होईल,अशा ठिकाणी शेततळे घेऊ नये. शेततळ्याचे आकारमान निश्‍चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्‍चित करावी. चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्‍चित करावी. शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे,ते पाणलोट क्षेत्र निश्‍चित करून त्याचे क्षेत्र मोजावे. शेतातील अपेक्षित अपधाव निश्‍चित करावा. एकूण अपधावाच्या ५० टक्के पाणीसाठा होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शेततळ्याचे आकारमान निश्‍चित करावे. शेततळे शक्‍यतोवर चौकोनी व खोल असावे.

शेततळी दोन प्रकारची असतात

1) खड्डा खोदून तयार केलेली.
2) नाल्याला आडवा बांध टाकून पाणी अडवलेली. शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्‍चित करावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे वळवावे. शक्‍यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.

शेततळ्यासाठी अस्तर

शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अस्तरासाठी बेंटोनाईट, माती- सिमेंट मिश्रण, दगड, विटा, सिमेंट मिश्रण, चिकणमाती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. प्लॅस्टिक फिल्म वापरताना त्याची जाडी 300 ते 500 जी. एस. एम. असावी. सिमेंट व माती प्रमाण 1-8 व जाडी पाच सें. मी. इतकी ठेवतात.

शेततळ्याची निगा

शेततळी ही काळ्या खोल जमिनीत बांधली गेली असतील तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी राहते; परंतु शेततळ्यात गाळ राहण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवणक्षमता कमी होते. शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जलसंधारणाचे उपाय करावेत. त्यामुळे पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही. शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर 2 × 2 × 1 मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते त्या ठिकाणी गवत लावावे. त्यामुळे गाळ खड्ड्यामध्ये साचेल आणि प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाची गवताच्या पानांमुळे गाळणी होईल. परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेततळ्याच्या आकारमानासंबंधी संशोधन करून पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार शेततळ्याचे आकारमान निश्‍चित केलेले आहे. तसेच साठलेल्या पाण्यातून संरक्षित सिंचनाच्या मात्रा निश्‍चित केल्या आहेत. शेततळ्यातील साठलेल्या पाण्यातून सहा सें. मी. खोलीचे संरक्षित सिंचन दोन वेळा देता येईल. इनलेट व आऊटलेट (प्रवेशद्वार व निर्गमद्वार) प्रवेशद्वाराच्या अगोदर साधारण दोन मीटर अंतरावर 2 × 2 × 1 मीटर आकाराचा सिल्ट ट्रॅपचे (गाळ साठणारा पिंजरा) खोदकाम करावे. शेततळ्याच्या दोन्ही द्वारांजवळ दोन मीटर लांबीपर्यंत दगडाचे पिचिंग करावे. शेततळ्याला काटेरी तार किंवा लाकडाचे कुंपण करावे, जेणेकरून जनावरांचा त्रास होणार नाही. शेततळ्याच्या योजनेचा प्रस्ताव संबधीत तालुका कृषि अधिकारी यांचे कडे सादर करावा लागतो. ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा. कँनाल लाभ क्षेत्रामध्ये शेततळे खोदावयाचे असल्यास पाटबंधारे खात्यातर्फे ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. आपल्या शेतामध्ये पडणा-या पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून गरजेप्रमाणे वापरता येते. तसेच परीसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होतो. शेततळ्याच्या अनुदानाबाबत अधिक माहितीसाठी तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.

माहिती स्त्रोत

मृद्‌ व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी डाँ.आर.एस.जाधव कृषि विज्ञान केंद्र,बारामती. (वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत: च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र जबाबदार राहणार नाही.)

गारगोटी © 2018