तुषार सिंचन
तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाण्याच्या दाबाच्या साह्याने जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा पिकावर स्वतःच्या आसाभोवती फिरणाऱ्या नोझलच्या साहाय्याने पाणी फवारले जाते. या पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी शेताचे आकारमान, पिकाचा प्रकार, हवामान, ऊर्जेचे साधन, पाणी उपलब्धता, जमिनीची पाणी शोषणक्षमता इत्यादी बाबींचा विचार करून संचाचा आराखडा तयार करावा लागतो.
शेतात सर्वत्र समप्रमाणात पाणी देण्यासाठी संचाची योग्य प्रकारे मांडणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी शेताची लांबी, रुंदी, चढ, उतार या बाबींचा विचार करावा. पाण्याचे साधन (विहीर, कूपनलिका इ.) शेताच्या मध्यभागी आहे किंवा कडेला आहे याचासुद्धा विचार संचाची मांडणी करताना करावा. सर्वसाधारणपणे लॅटरल पाइप्स उताराला आडवे टाकल्यास सर्व तुषार तोट्यातून पडणारे पाणी समप्रमाणात पडण्यास मदत होते.
वाऱ्याची दिशा व वेग यांचा शेतात पाणी समप्रमाणात बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. सर्वसाधारणपणे वाऱ्याचा वेग ताशी दहा कि.मी.पेक्षा जास्त असल्यास पाणी वाऱ्याच्या दिशेने जास्त प्रमाणात उडते व वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला कमी प्रमाणात उडते म्हणून शक्यतो वारा कमी असताना संच चालविल्यास पाणी समप्रमाणात उडण्यास मदत होते. आपल्याकडे पाण्याचा साठा किती आहे, मोटार दर तासास किती पाणी उपसते याविषयीची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. यावरून आपण एका वेळेस किती तुषार तोट्या चालवू शकतो, किती क्षेत्राला आपण संचाद्वारे पाणी देऊ शकतो याचे गणित मांडता येते व उपलब्ध पाण्यात तुषार सिंचनाद्वारे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येते.
तुषार तोट्यांतील अंतर
शेतात सर्वत्र समप्रमाणात पाणी देण्यासाठी दोन लॅटरल पाइप्स, तसेच दोन तोट्यांत ठराविक अंतर असणे गरजेचे असते. हे अंतर तुषार तोट्यातून पडणाऱ्या पाण्यावर व जमिनीच्या पाणीशोषण क्षमतेवर अवलंबून असते. जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा वेग जमिनीच्या पाणीशोषण क्षमतेपेक्षा कमी असला पाहिजे, जेणेकरून जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी साचणार नाही किंवा वाहणार नाही. समप्रमाणात पाणी देण्यासाठी तुषार संच योग्य दाबाला चालवावेत.
सिंचन कालावधी
एका ठिकाणी तुषार संच बसविल्यानंतर ठराविक क्षेत्राला आवश्यक तेवढे पाणी देण्यासाठी संच किती वेळ चालविला पाहिजे हे निश्चित करावे. आपल्याकडील पाण्याची व विजेची उपलब्धता लक्षात घेऊन तुषार सं चाद्वारे एका दिवसात किती क्षेत्राला पाणी देणे शक्य आहे हे ठरवावे व त्यानुसार संपूर्ण क्षेत्र भिजविण्याचे नियोजन करावे.
तुषार संचास लागणारा पंप
तुषार संचास इतर पद्धतींच्या तुलनेत जास्त दाबाची आवश्यकता असते. सदर दाब हा तुषार संचात योग्य त्या प्रमाणात पाणी फेकण्यासाठी, पाण्याचे साधन व जमिनीची पाण्याच्या साधनापासूनची उंची, तुषार संचाच्या पाइपची (रायझर) उंची, पाइपलाइन, बेंड इत्यादी ठिकाणी होणारा पाण्याचा व्यय इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. तुषार संचास योग्य अशा पंपाची निवड करताना तुषार संचाद्वारे द्यावयाची पाणी व एकूण दाब याची मा हिती असणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुषार संच जास्त दाबाला चालवावा लागतो, त्यामुळे पाहिजे त्या प्र माणात दाब मिळण्यासाठी विचारपूर्वक योग्य अशा पंपाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य अश्वशक्तीचा, योग्य दाब निर्माण करणारा व योग्य प्रमाणात तुषार संचास आवश्यक असणारा प्रवाह फेकणारा पंप निवडल्यास तुषार संचाद्वारे उत्तम प्रकारे क्षेत्र भिजविता येते.
तुषार सिंचन पद्धतीचे विविध घटक
1) पंपसेट व मोटार
2) गाळण यंत्रणा
3) मुख्य वाहिनी
4) उपमुख्य वाहिनी
5) लॅटरल पाइप्स
6) रायझर पाइप
7) नोझल किंवा तुषार तोटी
8) एण्ड प्लग
9) बेंड
10) टी
11) रायझर रिलीज कपलर (आर.क्यू.आर.सी.)
12) खत सयंत्र इ.
तुषार सिंचन पद्धतीचे फायदे
1) पिकाच्या गरजेप्रमाणे संपूर्ण क्षेत्राला समप्रमाणात पाणी घेता येते, त्यामुळे उत्पादनात सर्वसाधारणपणे 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ होते व पाण्यात 30 ते 35 टक्क्यांपर्यंत बचत होते.
2) उंच-सखल जमिनीवर एकसारखे पाणी फवारता येते, त्यामुळे जमीन सपाटीकरणाची आवश्यकता नसते.
3) पाण्याचे पाट व रानबांधणीची आवश्यकता नसते, त्यामुळे नेहमीच्या पद्धतीच्या तुलनेत आठ ते दहा टक्के जास्त क्षेत्र लागवडीसाठी उपलब्ध.
4) जमिनीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार (पाणी शोषण क्षमतेनुसार) पाहिजे त्या प्रमाणात क्षेत्र ओलित करता येते.
5) आवश्यक तेवढेच पाणी पिकाला देता येत असल्यामुळे जमिनीतील मूलद्रव्य पाण्याबरोबर खोलवर जाऊन वाया जात नाही, जमिनीची धूपही होत नाही.
6) पिकावर पावसासारखे पाणी पडत असल्यामुळे पिकावर येणारे काही रोग, किडींचे प्रमाण कमी होते व रोगनाशक अथवा कीटकनाशकावरील खर्चात बचत होते.
7) प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीसारखी रानबांधणी करावी लागत नाही; तसेच पाणी देण्यासाठी जास्त मजुरांची गरज पडत नाही, त्यामुळे मजूर खर्चात बचत होते.
8) ही पद्धत रात्री कार्यान्वित करणे शक्य असल्यामुळे दिवसा अनियमित वीजपुरवठ्याच्या ठिकाणी रात्री ओलित करणे शक्य होते.
तुषार संच वापरताना घ्यावयाची काळजी -
1) या पद्धतीत पाणी फवारून दिले जाते, त्यामुळे हवेत बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ही पद्धती शक्यतो दुपारी चालवू नये.
2) वाऱ्याचा वेग सर्वसाधारणपणे दहा कि.मी. प्रति तास यापेक्षा जास्त असल्यास सर्वत्र समप्रमाणात पाणी बसत नाही, त्यामुळे ही पद्धती सकाळी किंवा सायंकाळी अथवा रात्री जेव्हा वारा मंद असतो, अशा वेळी वापरात आणावी.
3) उसाच्या उंचीनुसार तुषार रायझरची उंची वाढविणे अत्यंत महत्त्वाचे असते.
4) तुषार संचाच्या विविध घटकांची निगा व दुरुस्ती वेळोवेळी करावी.
रेनगन तुषार सिंचन पद्धती
हा तुषार सिंचन संच नेहमीच्या तुषार सिंचन संचापेक्षा मोठा असून, एकाच वेळेस जास्त क्षेत्र भिजविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या संचामध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या मॉडेलच्या साह्याने एक स्प्रिंकलर साधारणपणे 125 ते 400 फूट इतक्या व्यासावरती 100 ते 1000 लिटर प्रति मिनिट या प्रवाहाने एका जागेवरून पाणी फवारू शकतो.
वैशिष्ट्ये
1) हा संच 3 ते 3.5 कि. ग्रॅम/सें. मी.2 या दाबावरती कार्यरत होते. सदर दाब निर्माण करण्यासाठी 7.5 ते 10 अश्वशक्तीचा पंप वापरावा लागतो.
2) नोझलमधून पडणाऱ्या पाण्याचा वेग नियंत्रित करून सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी देता येते, तसेच पृष्ठभागावरून पाणी वाहण्याचा प्रकार थांबविता येतो.
3) नर्सरी मधील रोपे, तसेच अगदी उगवणीनंतरच्या नाजूक रोपांसाठी कमी-जास्त होणाऱ्या जेट बेकरच्या साह्याने प्रवाह नियंत्रित करून अतिशय सूक्ष्म तुषारांच्या स्वरूपात पाणी देणे शक्य होते.
4) पूर्ण वर्तुळाकार किंवा विविध अशांत फिरणारी तुषार तोटी वापरून वेगवेगळ्या मॉडेलच्या साह्याने परिस्थितीनुसार पाणी देता येते.
5) संच वजनाने हलका असल्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सिंचन करता येते.
6) पीव्हीसी अथवा लोखंडी पाइपला रेनगन सहजपणे जोडता येते, तसेच शेताच्या लांबीप्रमाणे पाणी वाहून नेण्यासाठी नायलॉन होज पाइपचा वापरही करता येतो.
7) तुषार सिंचन संच देखभालीच्या दृष्टिकोनातून अतिशय सुलभ आहे.
रेनगन तुषार सिंचन पद्धतीचे फायदे
1) लहान तुषार सिंचन संचापेक्षा सिंचनासाठी लागणारे मनुष्यबळ व कालावधी यामध्ये बचत होते. नायलॉन होज पाइपचा वापर केल्यास एक किंवा दोन रेनगनमध्ये संपूर्ण शेत भिजविता येते.
2) पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून पिकाच्या गरजेइतकेच पाणी देता येते, त्यामुळे पाण्याचा होणारा अनावश्यक व्यय टाळता येतो.
3) जमिनीच्या पाणी शोषण क्षमतेनुसारच पाणी दिल्यास थोड्याशा उंच-सखल जमिनीतही पाणी देता येते व रानबांधणीचा खर्च वाचतो.
4) तुषार सिंचनाखाली शेतातील पाचटाचे कंपोस्ट खत लवकर तयार होण्यास मदत होते.
5) पाण्यात विद्राव्य खते देता येतात.
6) ठिबक सिंचन पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी येतो.
तुषार संचाचे व्यवस्थापन
मेनलाइन व लॅटरल्सची निगा आणि देखभाल
- पाइप्स फुटू नयेत व गळती होऊ नये म्हणून कधीही फेकू नये. वाहतूक करताना याची काळजी घ्यावी.
- पाइपवरून चालू नये, तसेच त्यावरून वाहनेही चालवू नयेत.
- खते, कीडनाशके किंवा इतर रासायनिक पदार्थांच्या समवेत पाइप्स ठेवू नयेत.
- सुगीपश्चात सर्व पाइप्स जमा करून जमिनीपासून अंतराळी लोखंडी किंवा लाकडी कपाटामध्ये (रॅकमध्ये) ठेवाव्यात.
- पाइप्स जर जमिनीवरच जमा करून ठेवायचे असल्यास त्यांचे एक तोंड थोडेसे उंचावर ठेवावे, म्हणजे त्या मधील साचलेले पाणी बाहेर येईल.
कपलर व्हॉल्व्ह व फिल्टरची निगा आणि देखभाल
- पाइप्स जेथे जोडले जातात, त्या ठिकाणच्या रबरी सीलिंग रिंग खराब झालेल्या नाहीत किंवा त्या ठिकाणी गळती होत नाही याची पाहणी करावी.
- सिंचनाच्या सुगीनंतर व संच काढून साठवण करण्यापूर्वी सर्व रबरी सीलिंग रिंग बाहेर काढाव्यात आणि त्या स्वच्छ, कोरड्या करून थंड व कोरड्या ठिकाणी साठवून ठेवाव्यात.
- रबरी सीलिंग रिंग्ज पुन्हा बसविताना त्या कपलरमध्ये व्यवस्थित व घट्ट बसल्या आहेत, याची खात्री करून घ्यावी.
- पाइप्समधून वाहणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे पाइप सिस्टिम व पंप खराब होऊ नयेत म्हणून हळुवारपणे व्हॉ ल्व्हस उघडावेत व बंद करावेत.
- ज्या वेळेस संच वापरात नसेल, त्या वेळी व्हॉल्व्ह घट्टपणे बंद करू नयेत.
- पोर्टेबल संचाचा फिल्टर दररोज स्वच्छ करावा, तर कायमस्वरूपी (परमनंट) संचाचा फिल्टर प्रत्येक आठवड्याला स्वच्छ करावा.
रायझर पाइप व फवारा तोटीची निगा व देखभाल
- रायझर पाइप लॅटरल पाइपला जोडताना प्रमाणित पदार्थांचा वापर करावा म्हणजे दोन्ही पाइपाना गंज चढणार नाही; तसेच संच साठवण करताना संचाचे भाग वेगळे करणे सोईस्कर होईल.
- तुषार तोट्या दररोज बाजूला काढावयाच्या असल्यास तोट्या सहजपणे फिरतात याची खात्री करावी; तसेच त्यामध्ये काही अडथळा आल्यास तो दूर करण्यासाठी टोकदार किंवा धारदार वस्तूचा वापर करू नये.
- तुषार तोटीचे सर्व भाग व्यवस्थित फिरतात याची खात्री करावी व तोट्यांना कधीही वंगण लावू नये, अन्यथा नोझल बंद पडू शकतात.
स्त्रोत: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
020-26902232